नागपूर - कामठी मतदार संघातील भाजपचे आमदार टेकचंद सावरकर हरविल्याची एक पोस्ट समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे. एवढेच काय तर संकटाच्या वेळी आमदार महोदयांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याने संतापलेल्या एका मतदाराने तर आमदार सावरकर यांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची पोस्ट देखील व्हायरल केली आहे. या संदर्भात आमदार टेकचंद सावरकर यांनी शहरातील वाठोडा पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली आहे. कोरोना काळात आमदार मतदार संघात फिरत नसल्याने नाराज मतदारांनी अनेक पोस्ट व्हायरल केल्या आहेत.
काय आहे प्रकरण -
नागपूरमध्ये कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याने सर्वसामान्य कोरोनाबाधित नागरिकांचे हाल होत आहेत. कोणत्याही स्तरावरून मदत मिळत नसल्याने आता नागरिकांमध्ये संताप निर्माण होऊ लागला आहे. या संकटाच्या वेळी आपल्या हक्काच्या आमदाराकडे मदत मिळणार अशी एक छोटीशी आशा प्रत्येकाला असते. कोरोनाच्या भीतीने अनेक आमदार घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यापैकी एक आहेत नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदार संघातील आमदार टेकचंद सावरकर. कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्यापासून टेकचंद सावरकर मतदार संघात फिरकले नाहीत. त्यामुळे अनेकांनी ते हरवल्याची बोंब ठोकली तर काहींनी श्रद्धांजली कार्यक्रमदेखील आटोपला. यामुळे संतापलेल्या आमदारांनी शहरातील वाठोडा पोलीस स्थानकात जाऊन पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
आमदारांनी दिले स्पष्टीकरण -
या संपूर्ण घटनाक्रमानंतर आमदार टेकचंद सावरकर यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की मला काहीही झालेले नसून जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे. परंतु, काही समाजकंटकांनी माझे कोरोनामुळे निधन झाले आहे, अशा खोट्या बातम्या प्रसारित केल्या आहेत. त्याकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये व अशाप्रकारच्या बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्या लोकांची माहिती माझ्या कार्यालयास कळवावे, असे आवाहन केले.
हेही वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये अँटिबॉडीज विकसित