नागपूर - वाकी येथील कन्हान नदीच्या परिसरात पिकनिक करीता गेलेल्या चार तरुणांचा मंगळवारी नदीत बुडाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यापैकी बुधवारी केवळ एकाचाच मृतदेह पोलिसांच्या हाती लागला होता. रात्रीच्या अंधारात आणि पावसामुळे शोध कार्यात अनेक अडचणी येत असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा नव्याने शोध कार्य सुरू झालं. मात्र, अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर देखील मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे घटनास्थळावरून मृतदेह पुढे वाहत गेल्याचा अंदाज बांधण्यात आला. त्यानुसार शोध मोहीम राबविण्यात आली असता काही अंतरावर तीनही तरुणांचे मृतदेह आढळून आले.
खापा पोलिसांनी तीनही मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हाधिकारी रुग्णालयात पाठवले आहेत. बुडालेल्या युवकांमध्ये तौफिक आशिफ खान, प्रवीण गलोरकर, अतेश शेख नासिर शेख आणि आरीफ अकबर पटेल या चौघांचा समावेश आहे. यापैकी अतेशचा मृतदेह मिळाला होता.
घटनाक्रम
नागपूर जिल्ह्याच्या सावेनर तालुक्यातील वाकी येथील एका वॉटर पार्क येथे नागपूर शहरातील आठ तरुण गेले होते. मात्र, येथे पोहोचल्यानंतर त्यांना वॉटर पार्क बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी परिसरात कन्हान नदीच्या पात्रात फिरण्यास जाण्याचा बेत आखला. आठही तरुण गाडीने कन्हान नदी पात्राजवळ गेले. त्यावेळी तोफिक आशिफ खान, प्रवीण गलोरकर, अतेश शेख नासिर शेख आणि आरीफ अकबर पटेल या चार तरुणांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, या युवकांना पाणी किती खोल आहे याचा अंदाज आला नाही. पाण्यात उतरताच ते चारही तरुण बुडू लागले. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने चारही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. गोताखोरांना काल फक्त एका युवकाचा मृतदेह आढळून आला. आज उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्यात आले आहेत.
फलकाकडे दुर्लक्ष करतात
वाकी येथील कन्हान नदीच्या पात्राचे खोल डोह आहे. या डोहात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. याची माहिती देणारे सूचना फलक सुद्धा लावण्यात आले आहे. मात्र, येथे येणाऱ्या युवकांना पोहण्याचा मोह आवरत नसल्याने फलकाकडे दुर्लक्ष करतात आणि पाण्यात उतरतात. यामुळे अशा घटना सातत्याने घडत असतात.
हेही वाचा - Delta Plus : काय आहे 'डेल्टा' आणि 'डेल्टा प्लस' व्हेरियंट?