नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर येथे काल(सोमवार) भरदिवसा मेश्राम दाम्पत्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह १० आरोपींना नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गोलू मालीये असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याने पूर्व वैमान्यातून मेश्राम दाम्पत्यावर गोळीबार केल्याचे कबूल केले आहे.
काल भरदिवसा कळमेश्वरच्या श्रीनीकेतन कॉलनी येथे अज्ञात गुन्हेगारांनी गणेश मेश्राम आणि त्याची पत्नी प्रियंका मेश्राम यांना संपवण्याच्या उद्देशाने त्यांच्याच घरात घुसून बेछूट गोळीबार केला होता. या घटनेत मेश्राम दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल केले. यानंतर, पोलिसांनी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणाचा समांतर तपास करण्याची जबाबदारी गुन्हे शाखेकडे देण्यात आली होती.
गोळीबार प्रकरणात गोलू मालीये हा संशयित असल्याने पोलिसांनी त्याचा शोध आधीच सुरू केला होता. दरम्यान, पोलिसांनी गोलु मलिये, फारूख खान, शोवीन मोकोडे यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. तर, गोळीबार प्रकरणाच्या कारणांचा शोध घेतला असता जखमी गणेश मेश्राम व गोलु मलिये यांचे जुने वैम्यनस्य असल्याची माहिती पुढे आली.
सुमारे १५ दिवसापूर्वी नागपूर शहरातील प्रतापनगर भागात दोघांमध्ये वाद झाला असल्याची माहितीसुद्धा पुढे आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जयताळा परीसरात गोलु मलियेचा सहकारी हिमांशु चंद्राकरला ताब्यात घेवुन विचारपुस केली. यावेळी, त्याने गोलू आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मेश्राम दाम्पत्यावर गोळीबार केल्याचे मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी गोलूच्या इतर सहकाऱ्यांना विविध ठिकणाहून अटक करण्यात आली आहे.