नागपूर - नुकतेच अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेला सुरूवात झाली आहे. नागपूर विद्यापीठाकडूनही ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहे; मात्र पहिल्या दिवसापासूनच या परीक्षेत तांत्रिक अडचणींना पांग फुटल्याचे दिसून येत आहे. सर्व्हर नसल्याचे अनेक विद्यार्थांना परीक्षेला मुकावे लागले आहे. शिवाय ९ ऑक्टोबर रोजी रद्द झालेला पेपर आता पुढे ढकलण्यात आले आहे. काल रात्री उशिरा ही माहिती विद्यापीठाकडून परिपत्रकाव्दारे देण्यात आली.
अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्या आहेत; मात्र ऑनलाईन परीक्षा देत असताना विद्यार्थांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. नागपूर विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या अॅपमध्ये विविध तांत्रिक अडचणी येत आहे. ऐन पेपरच्या वेळेत सर्व्हरच नसल्याने ९ ऑक्टोबर रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. शिवाय विद्यापीठाकडून सर्व्हरबाबत कोणतीही काळजी घेतल्या जात नसल्याचे अनेक विद्यार्थ्यांचे आरोप केले आहेत. त्यामुळे ९ ऑक्टोबरला होणारा पेपर आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. या बाबतची माहिती विद्यापीठ प्रशासनाने काल उशिरा एका परिपत्रकाव्दारे दिली आहे. मात्र ही परीक्षा पुढील रविवारी किंवा अन्य तारखेला घेण्यात येईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. असे असले तरी विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवस्था पूर्णपणे बळकट करूनच विद्यापीठाने पुढील परीक्षा घ्यावी, अशी विनंतीही विद्यार्थी करत आहे.