नागपूर - शहर बस सेवेच्या काही बस स्थानकांसह अन्य ठिकाणी आक्षेपार्ह मजकुरासह कागद चिटकवण्यात आले आहेत. यात भारत सरकार तसेच भारतात कार्यरत सर्व कंपन्यांना उद्देशून धमकी देण्यात आली आहे. या धमक्यांमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते, मात्र पोलिसांनी हे सर्व कागद आपल्या ताब्यात घेतले असून ही पत्रके कोणी लावली, याचा तपास पोलीस करत आहेत.
खुल्या वर्गाच्या गरीब (ईबीसी) विद्यार्थ्यांची, तरुणांची काळजी घेतली नाही, त्यांना नोकऱ्या दिल्या नाहीत, तर परिणामांना सामोरे जावे लागेल. यमराज बॉम्बच्या रिमोट कॅट्रोलवर बोट ठेऊन तयार आहे. तुम्ही जर आमच्या म्हणण्याला गांभीर्याने घेतले नाही, तर आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना देवाकडे पाठवू. आमच्याकडे शूटर्स आणि हल्लेखोर आहेत, अशा स्वरुपाची धमकी पत्रकांमधून दिली गेली आहे.
बस स्थानकावर अशा प्रकारची तीन पानी धमकी आज सकाळी काही लोकांना दिसून आली, तेव्हा हे प्रकरण समोर आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती महामार्गावरील कॅम्पसच्या अगदी समोर असलेल्या बस स्थानकावर देखील हे धमकी पत्र चिटकवण्यात आले आहे. यामुळे, यामागे कोणत्या विद्यार्थी संघटनेचा हात आहे का, याचा तपास करणे गरजेचे आहे.