नागपूर - महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल काल (मंगळवारी) जाहीर झाला. या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुठे खुशी तर कुठे गम होता. परंतु, काही विद्यार्थ्यांना निकालाचा धक्का सहन होत नाही. बारावीत (विज्ञान शाखा) मनासारखे गुण न मिळाल्याने नागपूर शहराच्या दत्तवाडी परिसरात एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. खुशी सिंग असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे.
खुशी सिंग सेन्ट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. खुशी अभ्यासात हुशार असताना देखील तिला १२ वीत ६६ टक्के गुण मिळाल्याने तिला जबर मानसिक धक्का बसला. भविष्यात डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, नियमानुसार नीटच्या परीक्षेला बसण्यासाठी बारावीत ७० टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. परंतु, खुशीला कमी गुण मिळाल्याने ती पूर्ण खचून गेली होती. त्यातून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने 'नीट'चे शिकवणी वर्ग देखील लावलेले होते. बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने पुढील भविष्य पाहिजे तसे साकार करता येणार नाही, अशी भीती तिच्या मनात होती. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर खुशीने घर गाठले. कुणाशी काहीही न बोलता ती तिच्या खोलीत गेली. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ ती खोलीबाहेर न आल्याने तिच्या आईने हाक मारली पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता खुशी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.
खुशीचे वडील ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. पालकांनी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही अपेक्षित यश मिळवू न शकल्याने आई वडिलांनासमोर कसे जायचे हा देखील विचार तिच्या मनात काहुर माजवत असावा. घटनेची माहिती वाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.