नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन केल्याच्या घटनेला आज 12 दिवस पूर्ण होत आहेत. या काळात सर्वच जनता शासन आणि प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करत असल्याचे दिसून आले. मात्र, काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांनी घरात बसावे यासाठी नागपुरात पोलिसांनी पथसंचलन केले.
हेही वाचा- #Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांनी शहरात आणि खासकरुन दाट वस्त्यांमध्ये पथ संचलन सुरू केले आहे.
नागपुरातील धरमपेठ परिसरात पोलिसांनी पथ संचलन करत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना कठोर इशारा दिला. संचारबंदी लावण्यात आली असून पोलीस दल रस्त्यावर आहे. त्यामुळे काही नागरिक विनाकारण बाहेर फिरणार असतील तर त्यांच्यवर कठोर कारवाई होईल, असा इशारा यावेळी पोलिसांकडून देण्यात आला. तसेच लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून घरात बसत आहेत. त्यांचे पोलिसांना धन्यवाद केले आहे.
नागपुरात आतापर्यंत १७ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. शेकडोंच्या संख्येने लोकांना घरात आणि विविध शासकीय इमारतीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे विविध कारणे देऊन घराबाहेर फिरणाऱ्यांना संक्रमणाचा धोका बळावला आहे. त्यामुळेच लोकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घरात राहावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा नागपूरकरांना या पथ संचलनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.