नागपूर - तळीरामांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार ड्राय-डे कमी करण्याच्या तयारीत आहे. त्याकरता राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे. या समितीच्या अहवालानंतर संपूर्ण राज्यभरात ड्राय डेचे दिवस निश्चित केले जाणार आहेत. राज्य सरकारने ड्राय-डे ची संख्या कमी केल्यास महसूलमध्ये वाढ होणार आहे.
सध्याच्या व्यवस्थेनुसार राज्यात सणासुदीच्या काळात प्रत्येक शहरात ड्राय-डे जाहीर केले जातात. प्रत्येक शहरात विविध जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे त्यांचे सण, उत्सव साजरे करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्या-त्या दिवशी शहरात दारू विक्री बंद केली जाते. त्या अनुषंगाने राज्याच्या वेगवेळ्या जिल्ह्यात ड्राय-डे वेगवेगळे दिवस निश्चित झाले आहेत.
राज्यात ड्राय-डेची संख्या कुठे जास्त तर कुठे कमी होत असल्याने राज्य सरकार ड्राय-डे कमी करण्याच्या तयारीत आहे. याकरता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर राज्यात सर्वत्र ड्राय-डेचे दिवस निश्चित केले जातील. तसेच ड्राय-डे कमी करण्याचा विचार केला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.