नागपूर- राज्यात प्लास्टिक बंदी असताना देखील प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर केला जातो. दुष्काळात चारा मिळत नसल्याने जनावरे कचरा खाऊन स्वतःची भूक भागवतात. मात्र, कचऱ्यात पडलेल्या या प्लास्टिकच्या पिशव्या मुक्या जनावरांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. नागपुरात गायीच्या पोटातून एक दोन नव्हे तर तब्बल ३५ किलो प्लास्टिक काढण्यात आले आहे.
नागपुरातील दुग्ध व्यावसायिक मौदे यांची गाय ही ७ महिन्याची गर्भवती होती. गायीने खाणे पिणे बंद केले होते. पशु चिकित्सक डॉ. मयूर पोटे यांनी गायीला औषध आणि इंजेक्शन दिले. मात्र, काही काळानंतर ही गाय पुन्हा आजारी पडली. यानंतर डॉ. मयूर यांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर गायीच्या आतड्यांमधून चक्क प्लास्टिक, लोखंडी, खिळे, नटबोल्टसह अनेक वस्तू निघाल्या.
प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यात फेकल्या जातात. त्यामुळे सहजपणे प्लास्टिक मुक्या जनावरांचा खाण्यात येते आणि प्राणी आजारी पडतात. त्यातच योग्य उपचार न मिळाल्याने अनेक जनावरांचा मृत्यू देखील होतो. अशी माहिती पशुचिकित्सक मयूर काटे यांनी दिली. त्यांनी आतापर्यंत २५ च्यावर जनावरांवर शस्त्रक्रिया करून प्लास्टिक बाहेर काढले आहे.