नागपूर - शहरात चेन स्नॅचिंग करून धुडगूस घालणाऱ्या इराणी टोळीला पकडण्यात अखेर गुन्हेशाखेला यश आले आहे. आरोपींनी २५ गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे.
या टोळीने शहरात अनेक चोरीच्या घटना घडवून आणल्या होत्या. त्यांची पद्धतदेखील वेगळी होती. चेन स्नॅचिंग केल्यानंतर पळून जाण्यासाठी ते दुचाकीचा वापर करायचे. पुढे काही अंतरावर एक कार उभी ठेवायचे, त्या कारमध्ये बसून ते आपले कपडेही बदलून घ्यायचे, ज्यामुळे त्यांच्यावर कुणालाही संशय येत नव्हता. मात्र, गुन्हेशाखेच्या पथकाने आरोपींची हुशारी ओळखून, त्यानुसार कारवाई करत त्यांना जेरबंद केले आहे.
सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एकट्या दुकट्या वृद्ध महिलांना गाठून ही इराणी टोळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि साखळी हिसकावून पळून जायची. शहरात अशा घटना वाढत असताना पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला. सोनसाखळी चोरून आरोपी पळून गेल्यानंतर ते कुठेही आढळून येतच नव्हते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या गुन्हा कारण्याची पद्धत जाणून घेतली तेव्हा ही माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला तेव्हा पोलिसांना गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इराणी टोळीच्या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महत्वाचं म्हणजे आपण सीसीटीव्हीत कुठंही रेकॉर्ड होऊ नये याची काळजीही हे आरोपी घ्यायचे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोलीस पोहचू शकत नव्हते. या आरोपींनी राज्यातील वेगवेगळ्या शहरात जाऊन चोरीच्या घटना केल्या आहेत.