नागपूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना समर्थन दिले ते विजयी झाले. त्यांचे करावं तितकं कौतुक कमीच आहे, कारण एनडीएचे घटकपक्ष असतानाही त्यांनी युपीएच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर विभागीय केंद्रातर्फे आयोजित माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा ८५व्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. भारताची प्रतिमा जगात कशी उंचावेल याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतिभाताई शतायुषी व्हाव्यात ही सदिच्छा यावेळी पवारांनी व्यक्त केली.
...तेव्हा प्रतिभाताईंनी सौम्य स्वभाव बाजूला ठेवला
प्रतिभाताईंनी अनेक पदे भूषवित असताना आपल्या कारकीर्दीची छाप उमटवली. प्रतिभाताई यांची भाषा सौम्य जरी असली तरी मला ती जाणवली नाही. कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हा त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. आपली जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपला सौम्य स्वभाव बाजूला ठेवल्याचे पवार म्हणाले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएतर्फे प्रतिभाताई पाटील यांचे नाव ठरले होते. प्रचारासाठी मी प्रतिभाताईंना घेऊन मुंबईत आलो. त्यानंतर आम्ही दोघे शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्री निवासस्थानी गेलो. बाळासाहेब म्हणाले चर्चा कसली करायची? प्रतिभाताई महाराष्ट्राच्या कन्या आहेत. शिवसेना त्यांच्याच बाजूने मतदान करणार असल्याचे बाळासाहेबांनी सिंगितले.
प्रतिभाताईंची ही गोष्ट अभिमानास्पद
भारतीय सैन्याने सुखोई हे अत्यंत वेगवान विमान घेतले होते. आवाज पोहोचायला लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळ हे विमान घेते. या वेगवान विमानात प्रतिभाताई एअरफोर्सच्या गणवेशात दिसल्या होत्या. त्यांनी सुखोई विमानाची चक्करही मारली. आपल्या देशाच्या भगिनीची ही कामगिरी फार अभिमानास्पद वाटल्याचे पवार म्हणाले.