नागपूर - शहरात महानगरपालिका हद्दीतील शाळा आज पासून होणार सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तब्बल १० महिने शाळा बंद ठेवाव्या लागल्या. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आजपासून नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळांची पहिली घंटा वाजली. कोविड संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि अटी-शर्थीचे पालनकरून शाळा सुरू होत असल्याने आज सकाळीच सर्व शाळा आणि वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक -
'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा, विद्यालये ४ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला होता. त्यानंतर शाळा व्यवस्थापन तयारीला लागले होते. कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना आणि अटींच्या अधीन राहून इयत्ता दहावी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळा प्रशासनाने शाळेमध्ये सुरक्षेच्या सर्व सुविधांची पूर्ती करणे आवश्यक आहे. शाळेमध्ये थर्मोमीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, सॅनिटायजर, साबण, पाणी आदी सर्व आवश्यक वस्तूंची उपलब्ध असण्याबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिल्या आहेत.
नागपूरच्या ग्रामीण भागातही शाळा सुरू -
१४ डिसेंबरपासून नागपूरच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. अद्यापही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के नाही. मात्र, समाधानकारक आकडा गाठण्यात शाळांना यश आले आहे. आता ग्रामीण भागापाठोपाठ नागपूर शहरातील पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी तयार होतील का? हे येत्या दिवसात स्पष्ट होईल.