नागपूर - येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व ४ मुलांसह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर येथे १९ मार्च १९८६ साली सहकुटुंब आत्महत्या केली होती. या घटनेची महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आली. आज या घटनेच्या ३३ व्या स्मृती प्रित्यर्थ नागपूरातील जनमंचतर्फे अन्नदात्यासाठी संवेदना हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. ४० एकर शेतीचा मालक असलेला साहेबराव आत्महत्येच्या निर्णयापर्यंतका आला ? या प्रश्नाने संवेदनशील मनांना अस्वस्थ करून सोडले होते. या घटनेनंतर राज्यात शेतकरी आत्महत्यांची जी साखळी सुरू झाली ती आजही अव्याहतपणे सुरू आहे.
संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपासून बोध घेत सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल, असा आशावाद साहेबराव करपे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नोंदवले होते. पण, तो आशावाद प्रत्यक्षात आलेला नाही आणि हे अत्यंत दुर्दैव आहे. वर्षानुवर्षे शेतकरी आत्महत्या हा प्रश्नच बनून आहे. कर्जबाजारीपणा नाही तर भूक बळी, शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही देखील मुख्य कारणे आहेत, अशी महिती जण मंचचे अध्यक्ष पांडे यांनी दिली.