नागपूर - मागील दोन दिवसात नागपुरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. एका दिवसात मिळणाऱ्या रुग्णसंख्येने सहा हजाराचा आकडा पार केला आहे. प्रशासनाने परिस्थितीची गरज लक्षात घेऊन अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये काही खाटा नागपूरच्या रुग्णांसाठी राखीव ठेवल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
शहरासह आता ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. ग्रामीण भागांमध्ये ऑक्सिजन खाटांची उपलब्धता करण्यात येणार आहे. मात्र, या काळात ग्रामीण भागातील रुग्णांनी दुर्लक्ष न करता ताप, अंगदुखी, सर्दी-पडसे, वास जाणे ही लक्षणे जाणवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात 12 हजार रुग्ण मिळून आले आहेत. यात शहरात खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे. यामुळे अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची मदत घेण्यात आली. शुक्रवारपासून अमरावतीला 12 रुग्ण पाठवण्यात आले आहेत.
खाटांची संख्या जाणून घेण्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन..!
ग्रामीण भागातील नागरिकांनी थोडीही लक्षणे जाणवताच कोरोना चाचणी करावी. यामध्ये आधी रॅपीड चाचणी करावी, टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी. जिल्हा नियंत्रण कक्षातील 0712-2562668 व 1077 या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा. ग्रामीण भागातील नागरिकांनी या परिस्थितीत मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे, लता मंगेशकर रुग्णालय, एम्स रुग्णालय या ठिकाणची खाटांची उपलब्धता व अन्य माहितीसाठी कॉल सेंटरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.
लक्षणे दिसतात चाचणी करा..
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली खाटांची संख्या वाढविण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाद्वारे गठीत समितीच्याही बैठकी सुरू आहेत. पण खाटा, ऑक्सीजन खाट, व्हेंटिलेटर या सगळ्यांना मर्यादा आहेत. यामुळे संसर्ग रोखण्यासाठी चाचणी करणे गरजेचे आहे. ‘मी जबाबदार’, या घोषवाक्यानुसार कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवहान केले जात आहे.
विनाकारण घराबाहेर न पडता सहकार्य करावे...!
येत्या शनिवारी व रविवारी कोरोना निर्बंधानुसार संचारबंदीला नागरिकांनी सहकार्य करावे. त्यामध्ये अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. सध्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनातर्फे येत्या 2-3 दिवसात काटोल, कामठी, मौदा, भीवापूर येथे ऑक्सिजन खाटांची सुविधा निर्माण करण्यासाठी काम केले जात आहे.