नागपूर - शहरात ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संमेलनाला हजेरी लावली. यावेळी पाहिल्यांदाच नाट्य संमेलनासाठी बोलावल्याबद्दल आठवले यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे युतीच्या जागावाटपात विचार करण्याचीही मागणी केल्याचे बोलले जात आहे.
नाटय संमेलनाचं असल्याने आपला आणि नाटकाचा संबंध उलगडून सांगताना त्यांनी लहानपणी शाळेत असताना आपण 'एकच प्याला' या नाटकात तळीरामची भूमिका साकारली होती असे सांगितले. यावेळी आपण फक्त पिण्याच्या अभिनय केला असल्याचे आवर्जून नमूद केलं. यावर लगोलग त्यांच्यातल्या कवीने कविता केली.
ज्यावेळी मी हातात घेतला एकच प्याला..त्यावेळी समोरचा मला भ्याला...तो एकदम थंड झाला....म्हणून मी फेकून दिला हातातला एकच प्याला
यानंतर त्यांनी ९९ व्या संमेलनाला शुभेच्छा देताना १००वे संमेलन कुठे असणार अशी विचारणा आयोजकाकडे केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथेच करू असे त्यांना सांगितले. त्यावर आठवलेंनी तत्काळ कविता केली.
१०० वे नाटय संमेलन इथेच करून टाकू आणि नरेंद्र मोदींची झोळी मतांनी भरून टाकू
आठवलेंच्या या कवितेला लोकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर त्यांची गाडी कवी असण्याकडे घसरली. आठवलेना त्यांच्या कवी असण्याचा सार्थ अभिमान आहे. याबाबत आपण कवी वगैरे नसून फक्त चारोळ्या करत असल्याचे सांगितले.
मी ज्यावेळी बोलायला उभा रहातो तेव्हा लोक ठोकतात आरोळ्या...मग लगेच सुचतात मला चारोळ्या
आपल्या या कलेची महती संसदेतही पोहोचली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान मोदींनी आपल्याला चार वेळा भेटल्यावर 'कैसे हो कविराज असं म्हटलाच त्यांनी सांगितले. ते ही त्यांनी लोकांना त्यांच्या शैलीत सांगितले.

आपले नाव आठवले असूनही नाटय संमेलनाला बोलवायच कुणाला आठवत नाही, असे ते म्हणाले. मात्र, यावेळी आपली आठवण आल्याचे सांगत आयोजकांचे आभार मानले. सद्या गडकरी आणि फडणवीस यांच्या मध्ये आपण असल्याने मला विसरून कुणी पुढे जाऊ नका, अशी कोपरखळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारली. एकूणच अवघ्या २०मिनिटांच्या भाषणात आठवलेंनी रसिकच रंजन केले. जाता जाता नाटय कलाकार ऐवजी नाटय संमेलनात साहित्यिकांना शुभेच्छा देऊन त्यांनी सगळ्याची रजा घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रेमानंद गजवी यांनी केलेल्या टिकला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, फक्त नक्षलग्रस्त साहित्य बाळगले म्हणून तुम्हाला अटक करण्याचा प्रश्नच नाही. तसे करायचे असेल तर मलाही अटक करावी लागेल, कारण मी स्वतः सगळे नक्षल साहित्य वाचले आहे. गजवी यांनी शुक्रवारी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मी उद्या नक्षलग्रस्त साहित्य बाळगले म्हणून मलाही अटक करणार का? असा सवाल विचारला होता.