नागपूर : शेंगदाण्यावर रासायनिक प्रक्रिया ( Chemical processing of peanuts ) करून त्याला पिस्त्याचे रूप दिले जात असलेला कारखाना नागपूर शहरातील गोळीबार चौकात सुरू आहे. या माहितीच्या आधारे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने ( Deputy Commissioner of Police Gajanan Rajmane ) यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने धाड टाकून तब्बल 120 किलो भेसळयुक्त पिस्ता जप्त केला आहे. एवढेच नाही तर साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. बाजारात शंभर ते 140 रुपये किलो दराने मिळणाऱ्या शेंगदाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर भेसळखोर शेंगदाण्याला पिस्ता म्ह्णून तब्बल 1100 रुपये दराने विक्री करत होते.
क्राईम युनिटच्या स्टाफची कारखान्यावर धाड : डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात एक पथक अवैध धंद्यांवर कारवाई बारीक लक्ष ठेवून आहे. हे पथक गणेशपेठ हद्दीतील एम्प्रेस मॉल परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक इसम संशयितरित्या जाताना दिसून आला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मनोज नंदनवार असे सांगितले. त्यांच्या गाडीत ज्यूटच्या बोर्यात शेंगदाण्याला भेसळ करून केलेले पिस्ता आढळून आला. याबाबत लगेच माहिती उपायुक्त गजानन राजमाने आणि सहाय्यक आयुक्त सचिन थोरबोले यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिटच्या स्टाफने कारखान्यावर धाड टाकण्यात आली तेव्हा भेसळ पिस्ताचे प्रत्येकी 40 किलो वजनाचे 3 ज्यूटचे पोते एकूण 120 किलो ज्याचे बाजारभावानुसार प्रति किलो 1100 रुपये नुसार 1 लाख 32 हजार रुपये किमतीचे भेसळ पिस्ता मिळून आला. कारखान्याची झडती घेतली असता त्याच्या घराच्या वरच्या माड्यावर दोन कामगार यंत्राने पिस्ताचे कट्टिंग करताना दिसून आले तसेच वरच्या माळ्यावर भेसळ पिस्ता वाळवून दिसून आले.
शेंगदाण्याला पिस्ता बनवण्याची प्रक्रिया : दिलीप पौनीकर नामक इसमाकडून कारखाना चालवला जात होता. ते 70 रुपये प्रति किलो किंमतीचा शेंगदाना घेऊन त्या शेंगदाण्याला उकडून त्याला वाळवल्यावर यंत्राच्या साह्याने त्याची कापणी करून त्याला परत वाळवून त्याला बाजारात 1100 रु प्रति किलो प्रमाणे पिस्ताच्या नावाने विक्री करून आर्थिक फायदा करून घेतो असे त्यांनी कबुली दिली आहे.
बारा लाख तेवीस हजाराचा मुद्देमाल जप्त : पोलिसांच्या कारवाईत बारा लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 1 लाख रूपये किमतीचे 2 यंत्रे, बाजार भावानुसार सात लाख किमतीचा भेसळयुक्त पिस्ता, दोन लाख किमतीचे भेसळकरणासाठी आणलेले शेंगदाणे असा 12 लाख 23 हजार
रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.