नागपूर: 2 वर्षानंतर नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारीची जास्त गरज असल्याने तसे निर्देश आढावा बैठकीत देण्यात आल्याची माहिती विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपुरात १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारी: नागपूर विधिमंडळ परिसराचे विस्तारीकरण करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देशित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशन काळात मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्थेला लक्षात घेऊन संसदेच्या प्रमाणे मध्यवर्ती 'बारकोड' पद्धतीचा अवलंब करणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. नागपूरमध्ये होऊ घातलेल्या डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात आज नागपूर विधिमंडळ परिसरात मंत्रीपरिषद सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला.
सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीत: गेल्या दोन वर्षानंतर अधिवेशन होत असल्याने नागपुरातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील आढावा सर्वप्रथम घेतला. नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील माहिती दिली. नागपुरातील विधिमंडळाचा संपूर्ण परिसर तसेच लोकप्रतिनिधींच्या वास्तव्याची सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीत असतील. मोर्चे, त्यांचे नियंत्रण ,भेटीचे ठिकाण शिष्टमंडळाच्या भेटी याबाबतही त्यांनी माहिती दिली. महिला आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात कडेकोट बंदोबस्त आमदार निवासात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी अधिवेशनासाठी दहा हजारावर पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असतील.
बार कोड पासेस: अधिवेशन परिसरात होणारी अभ्यासकांची गर्दी टाळण्यासाठी मोजक्या आणि सुरक्षित प्रवेशाची संसदेच्या धरतीवरील मध्यवर्ती बारकोड पद्धत अवलंब व्हावी,प्रवेशिका स्कॅन करून प्रवेश व्हावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे.
सभागृहाच्या परिसराला विस्तारीकरण: बदलत्या परिस्थितीत नागपूर येथील सभागृहाच्या परिसराला विस्तारित करणे आवश्यक आहे. अनेक कक्ष नव्याने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त जागा आवश्यक असून मुंबईप्रमाणे नागपूर येथे सेंट्रल हॉलची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून हा परिसर येणाऱ्या काळात विस्तारित करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांसाठी अतिरिक्त व्यवस्था करणार: विधानसभा आणि विधान परिषदेच्या वृत्तांकना संदर्भात मोठ्या प्रमाणात माध्यम प्रतिनिधींची संख्या वाढली आहे. माध्यमांचे स्वरूपही बदलले आहेत. त्या तुलनेत सभागृहामध्ये बैठक व्यवस्था अपुरी आहे, हे लक्षात घेऊन सभागृहाबाहेर सभागृहातील सर्व व्यवस्था असणारा शामियाना उभारण्याबाबतची सूचना अध्यक्षांनी यावेळी केली. पत्रकारांच्या वाढत्या संख्येला या आधुनिक सुविधांनी युक्त अशा शामियानामध्ये आतील कामकाजाचे वृत्तांकन करता येईल,असे त्यांनी यावेळी सांगितले.