नागपूर - आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीची सभा आज सायंकाळी ५ वाजता नागपूरमध्ये होणार आहे. संघाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात राहुल काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष आहे. लोकसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधी दोन दिवसीय दौऱ्यावरआहेत.
नागपूर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यासाठी आज राहूल यांचीसभा होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नुकतेच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नाना पटोले आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यामध्ये लढत होत आहे. तर रामटेक लोकभा मतदासंघातून किशोर गजभिये आणि शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांच्यामध्ये लढत होत आहे.
आज आदित्य ठाकरे रामटेकमध्ये -
रामटेक लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे हे नागपूरमध्ये आले आहे. त्यांचीही आज प्रचार सभा पारशिवनी आणि वाडी येथे होणार आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आजपासून २ दिवसांचा राज्यव्यापी दौरा सुरू होत आहे. आज सायंकाळी ५ वाजता नागपुरात त्यांची काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासाठी जाहीर सभा होणार आहे. तर उद्या विदर्भातील २ लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार असल्याचे आज काँग्रेसकडून सांगण्यात आले.
राहुल यांच्या दौऱ्यात झाला बदल -
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी राहुल गांधी यांची पहिली सभा ही चंद्रपूर किंवा वर्धा जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, त्यात बदल करण्यात आला असून आजच राहुल गांधी यांची पहिली सभा नागपुरात होणार आहे. तर त्यानंतर उद्या ५ एप्रिलला चंद्रपूर आणि वर्धा येथे २ सभा होणार आहे. त्यासोबतच राहुल गांधी हे उद्या सकाळी पुण्यामध्ये लक्ष्मी लॉन मगरपट्टा सिटी येथे सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
सभेच्या 'या' आहेत वेळा -
राहुल गांधी यांची आज सायंकाळी ५ वाजता नागपूर येथे कस्तुरचंद पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ एप्रिलला दुपारी २.३० चंद्रपूर येथे आणि सायंकाळी ४.३० वाजता वर्धा येथे जाहीर सभा होणार आहे. याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.