नागपूर - राज्यातील खरिपाच्या पेरण्या पूर्णत्वाच्या मार्गावर असताना विदर्भातील शेतकरी मात्र, खरिपाच्या पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा करत आहे. काही ठिकणी तुरळक पाऊस आल्याने बळीराजाने पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र, पुरेसा पाऊस नसल्याने खरीपाचे पीक धोक्यात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
वरूणराजाची अवकृपा बघता शेतकऱ्यांनी कमी पाण्याचे पीक घ्यावे असे आव्हान कृषी विभागाने केले आहे. थोड्याफार झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग करून उडीद, मूग व सोयाबीनचा पेरा केला. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणी केलेली पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. नागपूर जिह्यातील १३ तालुक्यांमध्ये वेगवेगळी पीके घेतली जातात. ४५ ते ४६% कापूस, ९१ ते ९५% तांदूळ, ९० ते ९२% सोयाबीन, तसेच ७ हजार एकरमध्ये कापसाचे पीक घेतले जात आहे. २ वर्षापासून चौराई धरणाचे पाणी देखील शेकऱ्यांना मिळत नसल्याने, शेती पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थित शेतकऱ्यांनी कमी पाण्याचे धान्य लावावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.