नागपूर - शहरात आजपासून (शनिवार) दोन दिवसीय जनता कर्फ्युला सुरुवात झाली आहे. या जनता कर्फ्यूत मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून घरीच राहणे पसंत केले आहे. यामुळे शहरवासियांनी जनता कर्फ्युला योग्य प्रतिसाद दिल्याचे बघायला मिळत आहे.
सकाळच्या सत्रात रस्त्यांवर कमी गर्दी दिसत आहे. फार कमी संख्येत लोक घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. काल (शुक्रवारी) महापौर, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय आमदार यांच्यात झालेल्या बैठकीत दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात यावे, असे ठरवण्यात आले होते. नागरिकांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल गांभीर्य निर्माण व्हावे, यामुळे ही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज (शनिवारी) सकाळपासून जनता कर्फ्युची अंमलबजावणी सुरू झाली आहे. फक्त दूध पुरवठा, कचरा संकलन, पाणीपुरवठा, औषध आणि रुग्णालयीन सेवा अशा अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. इतर सर्व सेवा आणि प्रतिष्ठान 2 दिवस बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी काढले आहे.
शहरात 60 ठिकाणी पोलिसांनी मोठी नाकाबंदी केली आहे. यासाठी 2 हजार 300 कर्मचारी, 350 अधिकारी यांच्यासह 350 होमगार्ड असे 3 हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना जनता कर्फ्युच्या बंदोबस्तात लावण्यात आले आहे. सातत्याने पोलिसांचे वाहन शहरात फिरून जनता कर्फ्युचे पालन करा, असे आवाहन करताना दिसून येत आहे.
दरम्यान, नागपूरच्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये महापालिका आणि विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक पायी फिरुन दुकाने बंद ठेवा, घराबाहेर निघालेल्या नागरिकांनी घरी परतावे, असे आवाहन करत आहेत. याप्रकारे एकूण 30 पथके शहरातील वेगवेगळ्या भागात आपली सेवा देत आहेत.
दरम्यान, या दोन दिवसीय जनता कर्फ्युमध्ये नागपुरकर किती गांभीर्य आणि अनुशासन दाखवतात, यावर पुढे शहरात लॉकडाउन करावे का? आणि आवश्यक असल्यास किती दिवसांचे लॉकडाउन करावे? याचा निर्णय होणार आहे. यासंदर्भात 31 जुलैला प्रशासनाने पुन्हा बैठक बोलावली आहे.. त्यामुळे जनता कर्फ्युमध्ये शहरवासियांचा योग्य प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे.