नागपूर - मध्यवर्ती कारागृहात कैदेत असलेल्या कैद्यांनी 10 हजार राख्या तयार केल्या आहेत. या राख्या सध्या विक्री करिता कारागृहाच्या विक्री आणि प्रदर्शनी केंद्रात उपलब्ध केल्या आहेत. या राख्यांचे दर अत्यल्प आहेत. त्यामुळे या राख्यांना नागपूरकरांची विशेष मागणी आहे. नागरिकांनी राख्या खरेदी साठी गर्दी करायला सुरुवात केली आहे.
नागपूरकरांना यंदाचे रक्षाबंधन खास राख्यांनी साजरा करता येणार आहे. नागपूरच्या केंद्रीय कारागृहातील कैद्यांनी खास इको फ्रेंडली राख्या तयार केल्या आहेत. धान्य, डाळ, कागद असे विविध पदार्थ वापरून कैद्यांनी या इको फ्रेंडली राख्या तयार केल्या आहेत. तुरुंग प्रशासनाने कैद्यांनी तयार केलेल्या या राख्या विकण्यासाठी ठेवल्या आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या शेजारील विक्री केंद्रात कैद्यांनी तयार केलेल्या इतर वस्तूंसह या राख्या खरेदी करता येणार आहे. सोमवारी नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे यांच्या हस्ते या विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कैद्यांना समाजात पुन्हा सामावून घेण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. कैद्यांनी स्वतःला रिकामे न ठेवता अशा उपक्रमांमध्ये गुंतविले तर त्यांना त्यांचे गुन्हेगारी आयुष्य मागे सोडून सुंदर भवितव्य निर्माण करणे सहज सोपे ठरेल, असे मत निलेश भरणे यांनी व्यक्त केले. भविष्यात कैद्यांच्या जीवनात आर्थिक सक्षमता यावी या करिता कारागृह प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असल्याचे कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले.