नागपूर President Visit To Nagpur : मध्य भारतातील नागरिकांचं विश्वासार्ह, खात्रीलायक, किफायतशीर उपचाराचं केंद्र असलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMC Nagpur) अमृत महोत्सवासाठी सज्ज झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (जीएमसी) अमृत महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडणार आहे.
चार मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार : जीएमसीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मैदानावर 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते डाक तिकीट कव्हरपेजचं अनावरण होणार आहे. जीएमसीच्या दोन नवनिर्मित सभागृहांचं डिजीटल उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच जीएमसीतून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी डॉ. बी. जे. सुभेदार, जीएमसीसाठी जमीन दान करणारे कर्नल कुकडे यांचे नातू अॅड. दिनकर कुकडे आणि या महाविद्यालयाला मदत करणाऱ्या डॉ. शकुंतला गोखले यांचे नातेवाईक डॉ. प्रमोद गिरी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणार आहे. या कार्यक्रमातच राज्यपालांच्या हस्ते जीएमसीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचं तसेच कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात येणार असल्याचं डॉ. गजभिये यांनी सांगितलं. या उद्घाटन समारंभाच्या दिवशी जीएमसीमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची कसोसीनं काळजी घेतली जाणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तिसऱ्या राष्ट्रपती : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जीएमसीला भेट देणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरणार आहेत. यापूर्वी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1953 मध्ये जीएमसीचा उद्घाटन समारंभ पार पडला. तर 1995 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते जीएमसीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन पार पडलं होतं.
नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षांत समारंभ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111 वा दीक्षांत समारंभ शनिवारी संपन्न होत आहे. या समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत समारंभात भाषण करणार आहेत. अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस भूषवतील. दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थिती राहणार आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्षे : विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाले असून हे शैक्षणिक वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालये आणि पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य सातत्यानं होत आहे. मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्याचं कार्य विद्यापीठ करीत असून यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असतो. हिवाळी 2022 आणि उन्हाळी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कृत केलं जाणार आहे. दीक्षांत समारंभामध्ये 79 हजार 447 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीनं देण्यात आली आहे.
हेही वाचा :