नागपूर - वाहतूक पोलिसांनी बुलेटसह स्टंट बाईक चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्या बुलेट गाडीचे मूळ सायलेन्सर बदलून त्या जागी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवण्यात आलेले आहेत, अशा बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे स्टंटबाजी करणाऱ्या वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर शहरात बुलेटसह स्टंट बाइक वापरणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलेटमधून होणाऱ्या आवाजाने अनेकांना त्रास होत आहे. त्या संदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या. आवाज करणाऱ्या बुलेट आणि स्टंट बाइक संदर्भात तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर पोलिसांनी त्या बाईक चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे.
त्यानुसार आज नागपूर शहराच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांतर्फे टीम तैनात करण्यात आल्या. ज्या वाहनचालकांच्या बाईकमधून आवाजाची मर्यादा ओलांडलेली असल्याचे आढळून आले आणि जे बाईक चालक स्टंटबाजी करत बेकायदेशीर वाहन चालवताना आढळून आले, अशा वाहनचालकांवर आज कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या सर्व गाड्या जप्त करून, त्यावर लावण्यात आलेले मॉडिफाइड सायलेन्सर पोलिसांनी काढून घेतले आहे. याशिवाय वाहनचालकांवर हजार रुपयांचा दंड देखील लावण्यात आलेला आहे.