नागपूर - शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीभवन चौकातील एका इमारतीत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मारला. यावेळी त्याठिकाणी काही अल्पवयीन मुलांसह इतर काही तरुण हुक्का पिताना आढळून आले. पोलिसांनी हुक्का पार्लरमध्ये आढळून आलेल्या 12 जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली. तर मालक निमेश बिरसानीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन अल्पवयीन यांचाही समावेश -
नागपूर शहराच्या मध्यभागी लक्ष्मी भवन चौक आहे. त्याच परिसरात असलेल्या एसीई कॅफेत अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना समजताच त्यांनी झोन-२ पथकाला कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पोलिसांनी हुक्का पार्लरवर छापा टाकला. तेव्हा त्याठिकाणी अनेक जण हुक्क्याचे सेवन करत करताना आढळून आले. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील युवकांसह तीन अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे.
पोलिसांनी हुक्का सेवन करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाहून १२ पॉट, फ्लेवर आणि इतर साहित्य जप्त केले आहेत.
हेही वाचा - भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ; 'या' कारणांसाठी पती किशोर वाघ यांची होणार चौकशी
हुक्का ही तर पहिली पायरी -
गेल्या काही महिन्यांपासून उपराजधानी नागपुरात अमली पदार्थांची विक्री वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये तरुण वर्ग सर्वात पुढे दिसत असल्याने पोलिसांनी ड्रग्स माफियांचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. सोबतच आजच्या तरूणाईमध्ये हुक्का पिण्याचे चलनही वाढत असल्याचे समोर येत आहे. ज्यांना अमली पदार्थ सेवन करण्याची सवय जडली आहे, त्यांनीही सुरुवात हुक्का ओढण्यापासुनच केली होती. त्यामुळेच ही पहिली पायरी असल्याचे म्हंटले जाते. यामुळे पोलिसांनी आता मोर्चा हुक्का पार्लरकडे वळवला आहे.