नागपूर : चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्याचे नायक शिपाई प्रफुल्ल पवारविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच शिपाई पवार पळून गेल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणातील तकारदार हे खासगी व्यवसाय करतात. त्यांना पैशाची गरज होती म्हणुन त्यांनी स्वत:ची दुचाकी एका सावकार मित्राकडे ठेऊन त्यांचाकडून १२ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ती रक्कम परत दिल्यावर तक्रारदाराने त्यांची दुचाकी परत मागितली असता सावकार मित्राने ती परत देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर तक्रारदारास त्यांची दुचाकी एका ठिकाणी दिसून आली असता त्यांनी मित्राच्या मदतीने आपली दुचाकी उचलून आणली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यामुळे तक्रारदाराच्या सावकार मित्राने तक्रारदाराविरुध्द् पोलीस ठाणे बजाज नगर येथे तक्रार केली होती. त्या तक्रारीची चौकशी नायक पोलीस शिपाई प्रफुल्ल नारायणराव पवार याच्याकडे होती.
मात्र, त्याने तक्रारदाराविरुध्द् चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना नायक पोलीस शिपाई प्रफुल्ल पवार यास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन तक्रार नोंदविली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा केल्यानंतर पोलिसाने लाच मागल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला. मात्र, शिपाई प्रफुल्ल पवार यास सापळा रचल्याची कुणकूण लागल्याने त्याने पळ काढला. या प्रकरणी पोलीस ठाणे बजाज नगर नागपूर शहर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.