नागपूर - खून, दरोड्यासह गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींनी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथून पोबारा केला होता. त्यापैकी 3 आरोपींना नागपूरच्या कळमना पोलिसांनी अटक केली आहे. रवी दुबे, मोनू ठाकूर आणि राजकुमार केराम, अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी छिंदवाडा येथे एका घरी सशस्र दरोडा टाकत घर मालकाची हत्या केली होती.
छिंदवाडा पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना अटक केली. मात्र, पोलिसांच्या गैरजबाबदारपणाचा फायदा घेऊन या सर्व आरोपींनी पोबारा केला होता. कळमना पोलिसांनी चोर समजून या अरोपींना अटक केली. त्यानंतर हे आरोपी खून आणि दरोड्याच्या घटनेतील आरोपी असून ते पोलिसांच्या ताब्यातून पळाले असल्याचे समोर आले. पोलिसांनी या संदर्भात छिंदवाडा पोलिसांना सूचना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाडेवाडीच्या जय अंबे नगर येथे एका संशयित चोराला नागरिकांनी पकडल्याची माहिती कळमना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कळमना पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केली असता, त्याने स्वतःचे नाव रवी रामप्रसाद दुबे, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आणखी विचारपूस केल्यावर आरोपीने गंभीर गुन्ह्यांची कबूली दिली. छिंदवाडा येथे दरोडा टाकत घरमालकाची हत्या करून हे फरार झाले होते. त्यामधील 3 आरोपी नागपूरच्या दिशेने आले होते.
पोलिसांच्या भीतीने हे सर्व आरोपी भांडेवाडीच्या जय अंबे नगर येथे सुरक्षित निवारा शोधत असताना त्यांनी हात साफ करायला देखील सुरुवात केली होती. मात्र, त्यांचे कारनामे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच रवी दुबे नामक आरोपीला नागरिकांनी पकडले आणि पोलिसांना चोर पकडल्याची सूचना दिली. तेव्हा रवीसोबत असलेले आरोपी पळून गेले होत. मात्र, पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवत अन्य दोंन्ही आरोपींना अटक केली.