नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोना संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. अशात विलगीकरण केंद्रातील संशयितांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी नागपूर पोलीस व सामाजिक संस्था समोर आल्या आहेत. विविध उपक्रमाद्वारे विलगीकरण केंद्रात असलेल्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत किंवा जे लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले आहेत अशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. नागपुरात एकूण पाच विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. सध्या नागपुरात सुमारे 650 संशयित या विलगीकरण केंद्रात आहेत.
विलगीकरण कक्षात असलेले कोरोना संशयित नियमांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी सुरवातीपासूनच आहेत. याठिकाणी आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांशीदेखील गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे, नागपूर पोलीस आणि आर संदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या मदतीने अशा संशयितांना मनोरंजनाच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे.