नागपूर - ईव्हीएम एक मशीन आहे, त्यामुळे आम्हाला ईव्हीएम नाही तर जनता मत देते. म्हणून जनतेच्या विश्वासाला पात्र व्हा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या ईव्हीएम विरोधी भूमिकेवर जोरदार टीका केली. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने तिसऱ्या दिवशी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच आम्ही जनतेशी संवाद करत आहोत तर तुम्ही ईव्हीएमरुपी मशीनीसोबत संवाद करत आहात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील तमाम जनतेचा जनादेश घेणे हे या यात्रेचे ध्येय आहे. निवडणुकांमध्ये यश-अपयश येत असते. मात्र, अपयश आल्यानंतरही जनतेशी नाळ टिकून राहणे हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात केलेल्या कामाविषयी ते म्हणाले की, राज्य सरकारने दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली आहे. विशेष म्हणजे २००९ साली आघाडी सरकारच्या काळात ज्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नव्हती त्या शेतकऱ्यांनाही आम्ही वीज जोडणी दिली. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी ८० टक्के अनुदान दिले. मात्र, याचवेळी विदर्भाचा विकास करताना कोणत्याही भागावर अन्याय होऊ दिला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी विविध योजनांच्या माध्यमातून विविध उपलब्ध करुन दिला. त्यासोबत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मागास भागात मोठ्या प्रमाणात काम केले. त्याचसोबत जे प्रकल्प पुढील २० वर्षांमध्ये पूर्ण झाले नसते ते आम्ही ५ वर्षात पूर्ण केले, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील रस्त्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, विदर्भात रस्त्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. तसेच विदर्भातील उद्योगक्षेत्रात भरभराट व्हावी यासाठी आम्ही इतर राज्यांच्या तुलनेत वीज स्वस्त केली. त्यामुळेच आज अमरावती येथील टेक्सटाईल पार्क ओंसाडून वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.