नागपूर - एकीकडे महाराष्ट्र ओल्या दुष्काळाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस हे सत्ता स्थापनेत गुंग आहेत. त्यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी केली. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा - संजय राऊतांची प्रतिक्रिया तरुण भारतच्या जिव्हारी, म्हणाले ही तर बौद्धिक दिवाळखोरी
महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे की, एक स्थिर सरकार मिळेल, याकडे काँग्रेस बारकाईने लक्ष ठेऊन आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात झालेली भेट केवळ एक शिष्टाचार भेट असल्याचेही पवन खेडा यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात निवडणुकीचे जे निकाल आले, त्यामुळे एक गोष्ट समजली की, पक्ष बदलून जिंकता येत नाही, जनता अशांना माफ करत नसल्याचे खेडा म्हणाले.
पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षाचे नेते अशा अनेकांच्या फोनमध्ये हस्तक्षेप करत हेरगिरी करण्यात आली. त्यामुळे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे की, सरकार कुठल्या एजन्सीने एनएसओची सेवा घेतली व कोणाची हेरगिरी केली. गेल्या साडे पाच वर्षात देशात जी परिस्थिती तयार झाली, त्यामुळे देशातील अनेक वर्गात राग व द्वेष आहे. दिल्लीतील पोलीस व वकिलांच्या संघर्षामागे हे देखील एक कारण असू शकते. तरीही या संघर्षांमागचे नेमके कारण काय याचा शोध घेतला पाहिजे असेही पवन खेडा यावेळी म्हणाले.
हेही वाचा - महायुतीने सरकार स्थापन करावे यासाठी काँग्रेसने केले धरणे आंदोलन