नागपूर- शहरात गर्दी करू नका म्हणणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एका माथेफिरूने हल्ला केल्याची घटना घडली. सुनील शिंदे असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून शेख राशीद शेख नाजीर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ईद निमित्ताने मुस्लीम समाजातील काही लोकांनी एकत्र येऊन नमाज पठाण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, कोरोनामुळे सध्या संचारबंदी आणि जमावबंदी असल्याने गर्दी करता येणार नाही असे शिंदे यांनी सांगताच शेख राशीद शेख नाजीर याने त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे यांनी अत्यंत शिताफीने त्याचा प्रत्येक वार परतवून लावला. मात्र, या हल्ल्यात शिंदे जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपी शेख राशीद शेख नाजीरला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस असल्याच्या कारणावरून प्रशासनाने सामूहिकरित्या एकत्र येऊन ईद साजरी करण्यास निर्बंध घातले होते. असे असताना देखील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्सा मशिदीजवळ सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती नंदनवन पोलिसांना कळाली. त्यानुसार सुनील शिंदे हे आपल्या सहकार्यांना घेऊन त्या ठिकाणी पोहचले. तेव्हा रशीद याने शिंदे यांच्या सोबत वाद घालायला सुरूवात केली. तुम्ही इथून निघून जा अन्यथा तुमचा खून करेल, अशी धमकी त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर देखील पोलीस तिथून न गेल्याने संतापलेल्या रशीदने त्याच्या जवळ असलेल्या धारधार शास्त्राने शिंदे यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्याने बेसावध शिंदे यांना ईजा झाली. मात्र, त्यानंतर आरोपीचा प्रत्येक वार हुकवत त्याच्यावर नियंत्रण मिळवता त्याला अटक केली आहे. नंदनवन पोलिसांनी आरोपी रशीदवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.