नागपूर - पाणी-पुरी खाऊन झाल्यानंतर पैसे देण्याच्या वादातून झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना नागपूरच्या खरबी चौक परिसरात घडली. या घटनेत पाणी-पुरी विक्रेता थोडक्यात बचावला आहे. खरबी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून आरोपी इम्रान रमजान अली याला अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
नागपूरच्या खरबी चौकात अरविंद ठाकूर नावाचा तरुण पाणी-पुरीचा ठेला चालवतो. येथे इम्रान रमजान अली नावाचा व्यक्ती दारू पिऊन पाणी-पुरी खाण्यासाठी आला होता. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर इम्रानने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अरविंद ठाकूर आणि इम्रान या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर या दोघांमध्ये हाणामारी देखील झाली. या घटनेत दोघेही जखमी झाले मात्र नंतर ते आपल्या कामाधंद्याला लागले.
इम्रान आपल्या घरी परत जात असताना त्याला त्याचे मित्र भेटले. तेव्हा इम्रानने घडलेला सर्व प्रकार आपल्या मित्रांना सांगितला. त्यानंतर इम्रानचा मित्र फिरोज हा काही मित्रांसह अरविंद ठाकूरच्या ठेल्यावर गेला. तिथे गेल्यानंतर आरोपींनी अरविंदवर हल्ला केला. या हल्ल्यात अरविंद हा थोडक्यात बचावला आहे. या हल्ल्या दरम्यान घटनास्थाळावर उपस्थित लोकांनी घटनेचा व्हिडिओ काढला व तो आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी इम्रानला अटक केली आहे.
हेही वाचा- मेट्रो ट्रेनचा असाही वापर...प्रवाशी नसलेल्या मेट्रोत 'प्री-वेडिंग फोटोशूट'