नागपूर - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपुरातून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. हे ऑपरेशन अतिशय गुप्तपणे राबवण्यात आले.
लखनौमध्ये हिंदू महासभेच्या कमलेश तिवारींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसने गुजरातमधील सुरतमधून दोघांना अटक केली आहे. सुरतमध्ये अटक झालेल्यांच्या माहितीवरून महाराष्ट्र एटीएसने नागपुरातील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - कमलेश तिवारी हत्या प्रकरण : तीनही आरोपींनी दिली गुन्ह्याची कबूली...
ताब्यात घेतलेल्या संशियिताचे नाव सय्यद असीम अली (29) आहे. त्याचा हार्डवेअरचा व्यवसाय आहे. परंतु याबाबत पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला नसून वरिष्ठ पोलीस अधिकारीही याबाबत कमालीची गुप्तता पाळत आहेत. सय्यद असीम अलीने कमलेश तिवारीविरोधात एका आंदोलनचेही आयोजन केले होते. शिवाय सुन्नी युथ विंग नावाच्या संस्थेचा तो संस्थापक देखील आहे.
हेही वाचा - कमलेश तिवारींची अमानुष हत्या देश, धर्म, हिंदुत्वासाठी मोठा आघात - साध्वी प्रज्ञा सिंग
एटीएसमधील अधिकारी याबद्दल स्पष्ट माहिती देत नाहीत. मात्र, नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवर बोलताना एटीएसने नागपूरात एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्याचा या हत्या प्रकरणात सहभाग होता किंवा नाही? हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.