नागपूर Nylon Manja Sales : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिका मधील प्राप्त आदेशान्वये आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाद्वारे पर्यावरण (संरक्षण) कायद्यानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मकरसंक्रात सणाच्या अनुषंगाने पतंग उडविण्यासाठी कृत्रिमरीत्या, प्लास्टिकपासून बनवलेल्या नायलॉन मांजा या नावानं परिचित असलेल्या पक्क्या धाग्यांचा वापर केला जातो. मात्र हा मांजा, धागा मानवासह पक्षी आणि इतर सजिवांकरिता धोकादायक आहे. (Abhijich Chaudhari)
जीवितहानी होण्याची शक्यता: नायलॉन मांजामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागपूर शहरातील सर्व मांजा विक्रेत्यांनी कृत्रिमरित्या प्लास्टिकपासून बनवलेल्या नायलॉन मांजाचा, पक्क्या धाग्यांचा वापर करू नये. नायलॉन मांजाचा वापर, विक्री, हाताळणी, साठवणूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर नियमान्वये कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.
नागरिकांनी माहिती द्यावी: नागपूर शहरातील नागरिकांना मांजाचा वापर न करण्याचं आवाहन करतानाच नायलॉन मांजाची विक्री करताना आढळल्यास मनपाला माहिती देण्याचं देखील आवाहन केलं आहे. नागरिकांनी नॉयलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांची माहिती मनपाच्या ८६००००४७४६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तसेच नागपूर महानगरपालिकेचं अधिकृत फेसबुक, इंस्टाग्रामवरील @nmcngp या पेजवर आणि एक्स (ट्विटर)च्या @ngpnmc या पेजवर टॅग करून द्यावी, असंही आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे.
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई: बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री केल्याप्रकरणी 24 जून, 2021 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीतील दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती. दुकानातून 11 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुनी मंडई येथील आशिष ट्रेडर्स आणि तेजस जनरल स्टोअर्स या दोन दुकानांवर कारवाई करत दुकान मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
'हा' मुद्दे्माल जप्त: प्लास्टिक, नायलॉन सिंथिटिक मांजामुळे पक्षी व मनुष्यास दुखापत होत असल्यानं उच्च न्यायालयानं आणि पर्यावरण विभागानं मांजावर बंदी घातली आहे. या हानिकारक मांजावरील दुकानात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणारी दोन इलेक्ट्रॉनिक मशीन, मांजाचे अठरा बंडल, असा 11 हजार 400 रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
'या' पोलिसांनी केली कारवाई: ही कारवाई पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उमेश दंडीले, सहायक फौजदार निकम, जगदाळे, माळी, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, अकबर शेख, कोकणे, नूतन जाधव, अजित राऊत, दशरथ इंगोले, यांनी केली. या गुन्ह्याचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे करत होते.
हेही वाचा: