नागपूर- शहराला पुढील महिनाभर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या जलप्रदाय समितीने हा निर्णय घेतला आहे. नागपूरला पाणी पुरवठा होणाऱ्या जलाशयांमध्ये भरपूर टक्के पाणी शिल्लक आहे. मात्र, पाणी वाहून आणणाऱ्या २३०० मिलिमीटरच्या पाईप लाईनमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने त्यांच्या दुरुस्तीकरीता एकदीवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली आहे.
अन्यथा उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई-
पेंच धरणातून तब्बल ६५ टक्के पाणी पुरवठा नागपूरला केला जातो. मात्र, गळती वाढल्याने वारंवार पाणीपुरवठा प्रभावित होत होता. त्यामुळे पाईपलाईनची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे. योग्य वेळी दुरुस्ती झाली नाही तर उन्हाळ्यात भीषण पाणी संकटाला तोंड द्यावे लागेल. यामुळेच हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी असल्यामुळे त्यावेळी दुरुस्तीच्या काम करत असल्याचे झलके म्हणाले.
पाणी जपून वापरा-
या पाणी कपातीमुळे मनपाच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार असून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन झलके यांनी केले आहे.