नागपूर - सरकार महाविकास आघाडीचे असले तरी, मागच्या सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही विकासकामांना आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करणार नाही, तर नेहमी पुढेच नेण्याचा आमचा मानस राहील. ती कामे आणखी चांगल्या प्रकारे करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
नागपूर 'माझी मेट्रो'च्या अॅक्वा लाईनच्या ११ किमी मार्गाच्या उद्घाटन सोहळा आज(मंगळवार) पार पडला. यावेळी ते बोलत होते. नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील सरकारने सुरू केलेल्या विकासकामांबाबत बोलताना, आम्ही कधी पक्षभेद मानले नसून विकासामध्ये सर्वांनी मिळून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आज सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, मागच्या सरकारने सुरू केलेल्या विकासकामांना बंद करण्याचा आमचा प्रयत्न नाही. उलट त्या कामांना पुढेच नेण्याचा प्रयत्न असून चांगल्या प्रकारे त्या कामांना दिशा देण्याचा प्रयत्न या सरकारचा राहणार आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - नियमांचे अन् वेळेचे पालन करा, पहिल्याच दिवशी मुंढेंच्या अधिकाऱ्यांना सूचना
नागपूरच्या विकासाचे इंजीन हे पर्यटन आहे. या पर्यटनाच्या दृष्टीकोणातून नागपूरचा विकास शक्य आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. हा विकास साकार करून दाखविणार असल्याचे राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - माझी मेट्रो नागपूर : 'मला श्रेय नको तर, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे'