नागपूर - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 300 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या निकालापेक्षा यावेळी भाजप व मित्रपक्षांच्या जागा वाढतील, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. २ दिवसांपूर्वी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर शनिवारी त्यांचे नागपुरात आगमन झाले. त्यावेळी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजप राष्ट्रीय स्तरावर ३०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, एवढेच नाही तर गेल्या वेळेपेक्षा २ ते ३ जागा जास्तच मिळतील, असा दावा गडकरी यांनी केला. प्रचारासाठी नरेंद्र मोदी नागपूरला येण्याची शक्यता असून अजूनपर्यंत त्यांचा पूर्ण कार्यक्रम ठरलेला नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींनी गंगेतून प्रवास केला, गंगेचे पाणी प्यायल्या हीच आमच्या कामाची पावती असल्याचे देखील गडकरी म्हणाले.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यापूर्वी नाना पटोले यांचे नागपूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले होते. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येत येऊन एका प्रकारे शक्तिप्रदर्शनच केले होते.
काँग्रेसप्रमाणेच नितीन गडकरी यांच्या आगमननिमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांना विमानतळावर एकत्रित येण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार, नितीन गडकरी यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानुसार नितीन गडकरी आणि नाना पटोले हे दोन्ही दिग्गज उमेदवार सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.