नागपूर - माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नितीन गडकरी काहीसे भावूक आणि चिंतीत दिसून आले. नागपुरात कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील आव्हानांसाठी आपल्याला तयार व्हावेच लागेल, असे ते म्हणाले.
हेही वाचा - लॉकडाऊनला नागपुरकरांचा उत्तम प्रतिसाद
नागपूर अतिशय कठीण स्थितीमध्ये
देवेंद्र फडणवीस यांच्या हातून अनेक चांगली कामे झाली, घडली असतील. मात्र, राष्ट्रीय कॅन्सर रुग्णालयाचे निर्माण त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे आणि हे सर्वात मोठे काम असल्याची पावती नितीन गडकरी यांनी फडणवीस यांना दिली. आज नागपूर अतिशय कठीण स्थितीमध्ये आहे. घरच्या घर कोरोनाबाधित होत असताना साधा एक बेड मिळणे देखील अशक्य झाले आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय कॅन्सर रुग्णालयामध्ये शंभर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत खाटांची संख्या २०० पर्यंत नेण्यात येणार आहे. 25 ते 35 बेड व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे असणार आहेत, असे गडकरी म्हणाले.
दूरगामी विचार करून वैद्यकीय व्यवस्था उभाराव्या लागतील
आज काही ठिकाणी ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी औषधांचा तुटवडा आहे. कोरोनाचे हे संकट किती काळ चालेल हे सांगता येत नाही. उद्या काय होईल याची देखील काही गॅरंटी नाही. एवढेच काय तर पुढच्या पंधरा दिवसांत, महिन्याभरात काय होईल, हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याचा दूरगामी विचार करून या सगळ्या वैद्यकीय व्यवस्था उभे कराव्या लागतील, असे देखील गडकरी म्हणाले.
अधिकाऱ्यांवर नाराज झाले गडकरी
आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा काही अधिकाऱ्यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविड चाचण्या बंद करण्याचे बोलून दाखवले. यावर नितीन गडकरी प्रचंड नाराज झाले होते. शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असे पर्यंत आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. या कठीण परिस्थितीमध्ये लोकांची सेवा आपल्याला कशी करता येईल, याचा विचार करा, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.
हेही वाचा - विधी विद्यापीठामुळे होईल राष्ट्रीय दृष्टीकोनाचा विकास; सरन्यायाधीश शरद बोबडे