नागपूर- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे यावर्षी सण आणि उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. उद्या गणरायाचे आगमन होत असताना कोरोनाच्या भीतीमुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे चित्र आहे. राज्य शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना गणेश मूर्ती बसवताना अनेक नियम आणि अटी लावल्या आहेत. त्यामुळे गणेश मंडळांच्या संख्येत ८० ते ९० टक्यांची घट झाली आहे. मात्र, घरगुती गणेश मूर्ती बसवण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
राज्याची उपराजधानी नागपुरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनाची वर्षभर वाट बघणाऱ्या गणेशभक्तांमध्ये गतवर्षी प्रमाणे उत्साह दिसून येत नाही. यावर्षी मना सारखा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करता येणार नसल्याने अनेक मंडळांनी माघार घेतली आहे. नागपूर शहरात दरवर्षी शेकडो मंडळे गणेशोत्सवासाठी अर्ज करतात. गेल्या वर्षी नागपुरात १११३ गणेश मंडळांनी पोलीस परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, यावेळी कोरोना महामारीमुळे केवळ ११० मंडळांनी गणपती स्थापनेसाठी पोलीस विभागाकडे अर्ज केला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय तलावांमध्ये विसर्जन करण्यावर सुद्धा निर्बंध आहेत. याकारणांमुळे अनेक मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार या वर्षी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना बाप्पाची मूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्ती २ फुट उंचीची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र गोळा होता येणार नाही. पूजा किंवा आरती दरम्यान गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. दर्शनाच्या वेळी सॅनिटायझर व मास्क वापरण्यासह शारीरिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहील. विसर्जनाची मिरवणूक सुद्धा काढता येणार नसल्याने बहुतांश मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे ठरवून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.