नागपूर - कळमेश्वर येथे 5 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्येसंदर्भात डीएनए चाचणी करण्यात यावी, असे विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे म्हणाल्या. याप्रकरणी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यादृष्टीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
कळमेश्वर येथील घटनेप्रकरणी पोलीस अधीक्षकांशी बोलणे झाले तेव्हा या संदर्भात डीएनए चाचणी करण्यात यावी, असे आपण सुचवले असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. ज्या मुली प्रतिकार करू शकत नाहीत अशा मुलींवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटना घडत आहेत. सामूहिक बलात्कार कसा करायचा याच्या व्हिडिओंचा मोठा व्यापार भारतात होत आहे. त्याचा वापर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यासाठी होत असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू, नागपुरात लोकांची निदर्शने
अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली. या निवेदनामध्ये सर्व द्रुतगती मार्गावर ऑनलाइन देखरेख झाली पाहिजे. एखाद्या रस्त्यावर मुलीची छेडछाड होत असल्याचे दिसल्यास लगेच मदत झाली पाहिजे, असे आपण सुचवल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. बलात्कार प्रकरणाचे निकाल लवकरात लवकर लागून फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या मुली अशा घटनेनंतर वाचल्या आहेत त्यांना साक्षीदार संरक्षण कायद्याअंतर्गत सुरक्षा दिली पाहिजे. महाराष्ट्रात स्थलांतर वाढले असून काही बाबतीत दबंगपणा वाढला आहे. त्यामुळेच अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्याचे देखील नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा - नागपूर: चिमुकलीवर अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी