नागपूर - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा प्रसंग असतो. तो अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक वधू-वर प्रयत्न करत असतात. नागपूरच्या मिथ चौधरी आणि भूमिका पांडे या नवदाम्पत्यानेही आपला विवाह सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा कला आहे.
मिथ आणि भूमिकाने लग्न सोहळ्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे. सहा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 11 हजार 111 रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली. सामाजिक कार्य करणाऱ्या एका सामाजिक संस्थेला देखील या दाम्पत्याने आर्थिक मदत केली.
हेही वाचा - अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री
मिथ हे कृषी क्षेत्रात संशोधक म्हणून कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात कार्यरत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था जवळून पहायला मिळालेली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र, आजच्या घडीला अनेक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था वाईट आहे. अशा काही कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने मदत करण्याचा निर्णय घेतला, असे मिथ चौधरी यांनी सांगितले.
मिथला नेदरलँडमध्ये चार फेलोशिप मिळाल्या आहेत. नेदरलँडमध्ये कार्यरत असताना मागील ऑगस्ट महिन्यापासून त्यांनी पैसे बचत करायला सुरुवात केली होती. लग्न सोहळ्यात शेतकरी कटुंबीयांना मदत करण्याची योजना त्यांनी भावी पत्नी भूमीकाला सांगितली. दोन्ही कुटुंबीयांनी मिथच्या सामाजिक उपक्रमाला संमती दर्शवली.