नागपूर - शहरात आज दिवसभरात २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळणले आहेत. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५८३ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परीचारिकेचा समावेश आहे. तिला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर तिची कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण आधीच क्वारंटाईन असल्याची माहिती आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मोमीनपुरा, नाईक तलाव, बजाज नगर, लोकमान्य नगर आणि हंसापुरी येथील रहिवाशांचा समावेश आहे. आज मेयो आणि मेडिकल रुग्णालयातुन कुणालाही डिस्चार्ज मिळालेला नाही.
सध्या नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयात १८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३९५ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या आठ दिवसात रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत असल्याने कोरोनातून बरे होण्याची टक्केवारी कमी झाली आहे.