नागपूर - सीबीआयची कारवाई सुरू असताना संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न फसला. पोलिसांनी सर्व आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. आक्रमक कार्यकर्त्यांनी सीबीआय आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.मात्र, पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर देशमुख यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
आज सकाळपासून सीबीआयचे एक पथक अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी कारवाई करत आहे. याआधी देखील सीबीआय ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडून अनेक वेळा देशमुख यांच्या निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतरदेखील केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती कुठलाही पुरावा लागत नसल्यामुळे हताशेपोटी सूडबुद्धीने अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
कोणता तपास सुरू आहे, हे आम्हाला सांगा - कार्यकर्ते
केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आल्या आहेत. धाडसत्र आजही सुरू असल्याने नेमका कोणता तपास केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित करत संतापलेल्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - 'महाराष्ट्र बंद'वर काय म्हणाले संजय राऊत?