नागपूर- ओबीसी समाजाला मिळत असलेल्या आरक्षणात हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. यासह अनेक मागण्यांसाठी आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थाना समोर थाळी वाजवा आंदोलन केले. याच प्रमाणे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत, अनिल देशमुख यांच्यासह लोक प्रतिनिधींच्या घरासमोर देखील अश्याच प्रकारचे आंदोलन करण्यात आले.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असताना आता ओबीसी समाजाने देखील आपल्या मागण्यांसाठी उग्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. चार दिवसांपूर्वी नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सभेची बैठक बोलावण्यात आली होती. ज्यामध्ये थाळी वाजवा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे आज आंदोलनाला सुरवात झाली आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याला आमचा मुळीच विरोध नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून दिल्यास ओबीसी समाज पेटून उठल्या शिवाय राहणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे.
याशिवाय राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह तयार करण्यात यावे, राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजातील घटकांची जात निहाय जनगणना करण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहे.