नागपूर: डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था संचालित 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट' गेल्या दोन वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत असून आज रुग्णालयाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले आहे. अमेरिकासारख्या देशांमध्ये कॅन्सरची रुग्णसंख्या ३३ टक्क्यांनी कमी होत असताना आपल्या देशात या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची बाब चिंताजनक आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून १८ ऑगस्ट २०१२ रोजी संस्थेच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली होती.
४७० बेडची व्यवस्था: जामठा परिसरात असलेले हे अद्ययावत रुग्णालय एकूण २५ एकरच्या परिसरात आहे. येथे ४७० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. अल्पावधीतच दुर्धर आजारांवर प्रभावी वैद्यकीय उपचार सुरू झाले आहेत. '२४ तास उपचार' या तत्त्वावर रुग्णालय काम करणार असून सकाळी ९ वाजल्यापासून तर दुपारी चार वाजेपर्यंत 'ओपीडी' सेवा सुरू राहील. याशिवाय 'इमर्जन्सी सेवा' ही २४ तास सुरू असणार आहे. 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट'मध्ये कॅन्सरच्या उपचाराकरिता सर्व सुविधा एकाच छताखाली येथे उपलब्ध आहेत.
सर्व प्रकारच्या कर्करोगावर होईल उपचार: 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट'मध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचार केले जाणार आहेत. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता उपचारासाठी मुंबईला जाण्याची गरज राहिलेली नाही. मुंबईमध्ये 'टाटा कॅन्सर' रुग्णालयात रुग्णांची सोय होत होती; परंतु या रुग्णालयावर प्रचंड ताण पडत होता. मध्य भारतातील कॅन्सरग्रस्त रुग्णांची सोय व्हावी यासाठी खास नागपुरात 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट'ची स्थापना करण्यात आली असून यामध्ये बालकांसाठी ‘पेडियाट्रीक वॉर्ड’ मध्ये नि:शुल्क उपचार केले जात आहेत.
'इन्स्टिट्यूट'ची वैशिष्ट्ये: कॅन्सरच्या उपचारासाठी ही विदर्भातील नव्हे तर मध्य भारतातील अग्रणी वैद्यकीय संस्था असून येथे जागतिक दर्जाची वैद्यकीय सोय उपलब्ध आहे. ४७० बेडचे कॉम्प्रीहेंसिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट युनिट, १० अद्यावत ऑपरेशन थियेटर, ओन्कॉलॉजी आयसीयु असलेले मध्य भारतातील एकमेव रुग्णालय, धर्मादाय पद्धतीने कार्य करणारे देशातील सर्वांत मोठे कॅन्सर रुग्णालय, लहान मुलांवर खास करून सर्व प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करणारे मध्य भारतातील एकमेव रुग्णालय ठरले आहे. आगामी काही महिन्यात रुग्णालयात 'बोनमॅरो ट्रान्सप्लांट युनिट' कार्यरत होणार आहे. यासह नवीन न्यूक्लियर मेडिसिन थेरेपी, आयोडीन थेरेपीसाठी वेगळे १० बेड अशी सोय देशात मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहे. आगामी काळात येथे थॅलेसेमिया आणि सिकलसेल सेंटर सुरू करण्याचा मानस आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार: 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट'मध्ये भरती होणारे पूर्णपणे बरे होऊन जातात. कॅन्सरच्या उपचार क्षेत्रातील प्रोटोन बिम, कार्बन आयन थेरेपीसारख्या अत्याधुनिक यंत्रणा किफायतशीर दरात 'एनसीआय'मध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.
हेही वाचा: Heatstroke Death Case : उष्माघात मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र शासनावर गुन्हा नोंदवावा; दुसरी याचिका पनवेल न्यायालयात दाखल