नागपूर - वाहतूक शाखेने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे 17 दिवसांच्या काळात शेकडो बेजबाबदार नागरिकांवर विनाकारण शहरात फिरताना कारवाई केली आहे. वाहतूक विभागाने बाहेर फिरणाऱ्यांच्या 900 गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच आयपीसी 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर 12 लोकांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे.
नागपूर शहरात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत असताना काही बेजबाबदार नागरिक लाखो लोकांच्या कामगिरीवर पाणी ओतण्याचे काम करत आहेत. अशा लोकांना अद्दल घडवण्याच्या उद्देशाने वाहतूक विभागाने कारवाईचा वेग वाढवला आहे. आतापर्यंत सुमारे नऊशे लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येक नागरिक एक योद्धा असून, त्यांना घरात राहूनच लढाई जिंकायची आहे. मात्र, अनेकांना घरात राहणे सुद्धा जमत नसल्याने अशांवर आणखी कठोर कारवाई केली जाणार आहे.