नागपूर - अगदी लहान वयात गुरूंकडून लाभेलेल्या मार्गदर्शनामुळेच आज जीवनाला पूर्णत्वाचा आकार प्राप्त झाला आहे. आई-वडिलांचे संस्कार आणि गुरूंजनांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच आज तब्बल ३० वर्ष पोलीस खात्यात नोकरी केल्याचे समाधान मिळत असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी त्यांच्या गुरूंना वंदन केले. तसेच 'गुरू करो जानके और पाणी पियो छानके', असा महत्वाचा संदेश त्यांनी दिला.
डॉ. भूषण कुमार उपाध्याय हे बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच पूर्ण झाले. त्यावेळी रामचंद्र प्रसाद नामक संस्कृत शिक्षक होते. त्यांच्या विचारांचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव माझ्या जीवनावर झाल्याचे डॉ. भूषणकुमार सांगातात. बालपणी संस्कृत विषयाची गोडी निर्माण झाली होती. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संस्कृत विषयाची निवड केली. त्यामुळे ६०० पैकी ४०० गुण मिळाले होते. त्यामुळे यूपीएससीची परीक्षा पास करून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होऊ शकलो, असे उपाध्याय सांगातात.
पोलीस दलातही अनेक गुरूंचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे ते सांगतात. यामध्ये माजी आयपीएस अधिकारी के. एल. प्रसाद यांनी पोलीस कल्याण निधीचा उपयोग पोलिसांसाठी कशाप्रकारे करायचा? याची शिकवण दिली. आपण आपल्या पोलीस बांधवांची काळजी घेतली, तर ते पोलीस आपल्या विभागाची काळजी घेतात. त्यांनी सांगितलेल्या सूत्रांचा आजची उपयोग होतो. म्हणूनच ३० वर्ष भारतीय पोलीस दलात काम केल्याचे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुशिवाय मार्ग नाही, याची कल्पना असल्यानेच आजची गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.