नागपूर - घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या ४ सदस्यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसाह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसीम शेख मकसूदी, शहनवाज वल्दबाबू, मोहम्मद मोहसिन वल्द शगीर आणि मोहम्मद राईस कुरेशी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून नागपूरच्या पाचपावली आणि जरीपटका भागात चोरीचे प्रमाण वाढले होते. दरम्यान, १२ फेब्रुवारीला रजेश टॉवर या इमारतीत २ घरफोड्या झाल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करताना पाचपावली पोलिसांनी सीसीटीवी फुटेज तपासले. त्यामध्ये दिल्ली पासिंग असलेली एक स्विफ्ट कार त्यांना संशयास्पदरित्या आढळली. ती गाडी कुठल्या कुठल्या मार्गाने गेली, हे तपासण्यासाठी पाचपावली पोलिसांनी अनेक महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामधून ती गाडी भोपाळ मार्गे ग्वालियर आणि नंतर मेरठकडे गेल्याचे स्पष्ट झाले. पाचपावली पोलिसांनी मेरठ पोलिसांशी संपर्क साधून त्या गाडी संदर्भात सूचना दिली. मेरठ पोलिसांनीही पाचपावली पोलिसांच्या सूचनेवर तात्काळ कारवाई करत त्या गाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली. तपासादरम्यान, ती गाडी मेरड जवळील एका टुरिस्ट ढाब्यावर उभी असल्याचे आढळले. मेरठ पोलिसांनी गाडीतील चार आरोपींना धाब्यावर जेवण करत असताना अटक केली.
पाचपावली पोलिसांनी मेरठ गाठून चारही आरोपींना अटक करुन नागपुरात आणले. पोलिसांनी आरोपींकडून वीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत २५ लाख रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी नागपुरात अनेक घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. याशिवाय मध्य प्रदेशमधील भोपाळसह अनेक जिल्ह्यात चोऱ्या केल्याची माहिती पुढे आली आहे.