नागपूर - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या १०वी आणि १२ वीच्या परीक्षेत बनावट परीक्षार्थी बसवणारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका बदलून त्यांना उत्तीर्ण करून देणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणात नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा समावेश आहे.
बारावीची परीक्षा आटोपली असून दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये बनावट विद्यार्थी बसवणे आणि मूळ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका बदलून त्यांना उत्तीर्ण करून देणारी टोळी नागपूर शहरात सक्रिय असल्याची गुप्त माहिती जरीपटका पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कसून चौकशी सुरू केली. माहितीत तथ्य आढळून आल्यामुळे जरीपटका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणात एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक सहभागी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते दोन प्रकारे विद्यार्थ्यांची मदत करायचे. एका विषयासाठी दहा हजार रुपये आकारायचे पहिल्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर बनावट विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिटकवायचे. दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेला बनावट विद्यार्थी दुसऱ्याच्या नावाने परीक्षा द्यायचा. याशिवाय आरोपी उत्तर पत्रिकेवरील बारकोड किव्हा होलो ग्राम काढण्यासाठी 220 वॅटच्या ब्लबचा उपयोग करायचे. ब्लबच्या उष्णतेमुळे खऱ्या उत्तरपत्रिकेवर असलेले बारकोड होलोग्रमवरचे गोंद निघून जायचे. यानंतर ते बनावट होलोग्राम चिटकवून ती उत्तर पत्रिका परीक्षकांकडून तपासून घ्यायचे. यामुळे बनावट उत्तरपत्रिकेच्या आधारे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल उत्तीर्ण असा लागायचा. पोलिसांनी या प्रकरणात सेवानिवृत्त प्राध्यापकासह तिघांना अटक केली आहे. यामध्ये एक अल्पवयीन आरोपी असून त्याला त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी मोठे आरोपी गुंतले असल्याचा संशय असून या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.