नागपूर- दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या आमदार निवासासमोर भरदिवसा 18 लाख रुपयांची लूट झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात नागपूर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात चार आरोपींच्या मुसक्या आवळून सहा लाखांची रोकड जप्त केली आहे,अशी माहिती नागपूर शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी दिली आहे.
संपूर्ण पोलीस विभाग कोरोनामुळे तयार झालेल्या कंटेंनमेंट झोनसह शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यात व्यस्त आहेत.या परिस्थितीचा फायदा घेत सोमवारी 18 लाखांची रोकड बँकेत भरायला निघालेल्या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या दोघांना तीन मोटारसायकल वरून आलेल्या सहा आरोपींनी आमदार निवासापुढे थांबवून त्या दोघांना मारहाण केली आणि त्यांच्या जवळ असलेले 18 लाख रुपये घेऊन पोबारा केला होता.
या घटनेची तक्रार दाखल होताच गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासानंतर या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यांनंतर अवघ्या 24 तासात चार आरोपींच्या मुसक्या अवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
अद्याप 2 आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत,त्यांचा शोध घेतला जात आहे. 18 लाखांची रक्कम एका खाजगी कंपनीची असून ती बँकेत भरायला कर्मचारी निघाले होते. आरोपींना त्या संदर्भात माहिती कोणी दिली याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.