नागपूर - शहर पोलिसांच्या पथकाने बेकायदेशीरपणे रेती (वाळू)चे उत्खनन करून सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडावणाऱ्या रेती माफियांच्या विरोधात कारवाई केली आहे. अवैध रेती तस्करी करणारे सात ट्रक पोलिसांनी जप्त केले असून त्याची किंमत १ कोटी २८ लाख रुपये इतकी आहे.
१ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त -
गुप्त माहितीच्या आधारे नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नेरी गावातील सिंगारदीप घाटावर पोलिसांनी सापळा रचला होता. रात्रीच्या वेळी अवैधपणे अनेक ट्रकमध्ये मशीनच्या मदतीने रेती भरली जात होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून ७ डंपर (ट्रक) जप्त केले आहेत. डीसीपी झोन ५ चे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय बैसे यांनी छापा टाकला होता. जप्त करण्यात आलेले ट्रक आणि इतर मशिन्सची किंमत १ कोटी २८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
आठ ट्रक चालक, काही क्लिनरसह मजूर ताब्यात -
अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक केल्या प्रकरणी आठ ट्रक चालक आणि क्लिनरसह काही मजुरांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. वाळूच्या अवैध वाहतूकीसंदर्भात महाराष्ट्र राज्य जमीन महसूल संहिता व महाराष्ट्राच्या जमीन महसूल नियम १९६८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना २७ मे पर्यंतची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - काय सांगता...कराचा भरणा केल्यास मिळणार एक तोळे सोन्याची चैन, पैठणी आणि बरेच काही!